- मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना करण्यात येते सन्मानित
पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून विशिष्ट नियमांच्या अधिन राहून मूलभूत निकष पूर्ण करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटराव पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध गणेश मंडळांची परीक्षणे करण्यात आली.
गणेशोत्सव साजरा करत असताना मंडळांनी आवश्यक परवानग्या सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला नाविन्यपूर्ण संदेश देणारे उपक्रम डीजे ऐवजी परंपरागत वाद्यांचा वापर विसर्जन मिरवणुकीसाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे का? तसेच वैशिष्ट्यपूर्ण जनजागृतीचे संदेश याला प्राधान्य दिले आहे का? या बाबींना परीक्षण करत असताना प्राधान्य दिले गेले.
पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मोरया पुरस्कारासाठी सर्वप्रथम झोन लेव्हलवरून गणेश मंडळांची यादी आयुक्तालयास प्राप्त झाली व त्यानंतर आयुक्तालयाच्या परीक्षण समितीमार्फत संबंधित गणेश मंडळांचे परीक्षण करण्यात आले. यावेळी घालून दिलेल्या सर्व निकषांची पूर्तता केली आहे का? याला विशेषत्वाने प्राधान्य दिले गेले. ज्या मंडळांना मागील वर्षी मोरया पुरस्कार मिळाला. त्यांनी यावर्षी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून अधिक चांगल्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला व इतर मंडळांनीही अधिकाधिक चांगल्या प्रकारे समाज प्रबोधन पर उपक्रमांची निवड करून मोरया पुरस्कारासाठी अधिकाधिक मूल्यमापन निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
या परीक्षण समितीमध्ये आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार (Arvind Pawar), अजित वडगावकर, धनंजय कुलकर्णी, सुभाष मालुसरे, लक्ष्मण शिंदे, संदीप पोलकम, संतोष सातारकर, शशिकांत हुले व अविनाश हटकर यांनी परीक्षण केले. यावेळी अरविंद पवार आणि समितीने एका तरी मुलाला दत्तक घेऊन अथवा परिस्थिती नसलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी विनंती केली. (Lokmarathi News Network)