विठाईच्या माध्यमातून वाचन संस्कृतिची जपणूक – कुंदाताई भिसे

विठाईच्या माध्यमातून वाचन संस्कृतिची जपणूक - कुंदाताई भिसे
  • उन्नती सोशल फाउंडेशन संचलित विठाई मोफत वाचनालया च्या वतीने जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला

पिंपरी, दि, 23 : माहिती व तंत्रज्ञानाच्या (डिजीटल) युगामध्ये पुस्तक वाचन संस्कृती लोप पावताना दिसत आहे. तिची जपणूक करण्यासाठी सर्वांनी पुस्तक वाचनाला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या भागातील वाचक प्रेमींना सहज पुस्तके उपलब्ध व्हावी म्हणून आपण विठाई वाचनालयाच्या माध्यमातून पुस्तक संच उपलब्ध केले. त्याचा शेकडो वाचकांना फायदा होत आहे, असा विश्‍वास उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी व्यक्त केला.

पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील उन्नति सोशल फाऊंडेशनच्या विठाई वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. यावेळीे उन्नतिच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे (Kunda Bhise) यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. लेखिका सौ. अनिता भिसे, सौ. कल्पना बागुल, उद्योजक संजय तात्याबा भिसे, ऑल सिनियर सिटिझन असोसिएशन ऑफ पिंपळे सौदागरचे सदस्य, डॉ. सभाषचंद्र पवार, विलास जोशी, सतिश पिंगळे, प्रा. वॉट्टमवार ढाकणे, विजय रोकडे, मधुकर पाटील, सुभाष पाटील, रमेश सोनवणे, मधुकर चौधरी, श्रीनाथ जोशी यांच्यासह परिसरातील वाचक प्रेमी उपस्थित होते.

लेखिका सौ. अनिता भिसे म्हणाल्या, पुस्तक वाचनाने मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कधी नतमस्तक होत नाही. त्यामुळे पूर्वीपासुनच वाचनाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. वाचन केल्याशिवाय विषयाचा गाभा समजत नाही. एखाद्या विषयावर आपले मत तयार करण्यापूर्वी वाचन हे करावेच लागते. वाचनाविना मोघम बोलणे व्यर्थ आहे. त्यामुळे वाचन संस्कृतिला चालना मिळावी यासाठी विठाईच्या माध्यमातून चांगले कार्य घडत आहे. वाचक प्रेमींची वाचनाची आवड जोपासण्यासाठी हजारो पुस्तकांचे भांडार उपलब्ध आहे. त्याचा आज नागरिकांना फायदा होत असताना आनंद वाटतो.