- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा
नारायणगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा आहे, म्हटलं तर समाधानाचा, अगदी दसरा – दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे. त्यामुळे ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशी भावना सर्वांच्या मनात आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच हे संपूर्ण यश तमाम बैलगाडा मालक, शौकिनांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बैलगाडा शर्यतींवर लवकरच आपण चित्रपट बनवणार असल्याचे सांगून त्याची तयारी आधीपासूनच सुरू झाली असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. बैलगाडा मालकांचे कष्ट, त्यांचं बैलांशी असलेलं नातं या सगळ्याचा उहापोह यात असेल त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय दबावतंत्र या बैलगाडा शर्यतींसंदर्भात वापरलं जातं ही बाब गेली ४ वर्ष संसदेत हा विषय मांडताना फार जवळून बघतोय. या आंतरराष्ट्रीय दबावाचा बुरखा फाडणारा हा चित्रपट लवकरच मायबाप प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
आजच्या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने काही अटी, शर्ती घालून बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यामुळे बंदी उठल्याचा जेवढा आनंद आहे, तेवढीच जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे पुढील काळात सर्व नियम, अटी-शर्ती पाळून दिमाखाने बैलगाडा शर्यतींचे आयोजन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होताच आज बैलगाडा मालक शेतकऱ्यांनी नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित असलेल्या खासदार डॉ. कोल्हे यांना पेढा भरवून जल्लोषात आनंद साजरा केला. यावेळी ते म्हणाले की, भल्याभल्यांना वाटत होतं की, बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळणार नाही. परंतु मी पहिल्यापासून ठामपणे व आत्मविश्वासाने सांगत होतो की या सगळ्यासाठीचे एक नॅरेटिव्ह महत्वाचे आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हा लढा लढला पाहिजे, नव्याने मांडणी केली पाहिजे या माझ्या मतावर बैलगाडा मालक शेतकऱ्यांनी अगदी मनोमन विश्वास ठेवला. त्याला महाविकास आघाडी सरकार तसेच सध्याच्या सरकारने, यंत्रणांनी साथ दिली त्यांचा मी ऋणी आहे. विशेषतः गिरीराज सिंह यांनी खूपच सहकार्य केले त्यांचे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब, गटनेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचेही मार्गदर्शन लाभले, त्यांचेही मी मनापासून ऋण व्यक्त करतो. तसेच अनेक वर्षे सातत्यपूर्ण लढा देणाऱ्या बैलगाडा मालकांचे व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे खासदार डॉ. कोल्हे यांनी आभार मानले.