मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या

मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या
  • मनपाच्या क्रीडा धोरणात ऑलिम्पिक विचारांचा दृष्टिकोन ठेवा

पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवडच्या वतीने आज आयुक्त शेखर सिंह यांना व्यापक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या बद्दल आम आदमी पार्टीच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकारच्या २००१ च्या क्रीडा धोरणातील विविध शिफारशीचा अवलंब मनपा प्रशासनाने केलेला नाही.पायाभूत सुविधासह भारतीय मैदानी व ऑलिम्पिक दर्जाच्या खेळासाठी शहरातील खाजगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देणारे मनपाचे क्रीडा धोरण असले पाहिजे,त्यासाठी आम्ही खालील मागण्या आयुक्त साहेबांना केलेल्या आहेत असे आप क्रिडा आघाडी अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले. ‘आप’च्या व्हिजन डाक्युमेंट मध्ये आमचे क्रीडा धोरण स्पष्ट करत आहोत असे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले.

या आहेत मागण्या

१)पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना मनपाच्या हॉस्पिटलमध्ये मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा मनपा मार्फत मोफत आरोग्य विमा काढण्यात यावा.

२) शहरातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदकविजेते खेळाडूंना दरमहा पेन्शन सुविधा चालू करण्यात यावी.

३)पिंपरी चिंचवड महानगरपालिका नोकर भरती मध्ये स्थानिक खेळाडूंना प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच खेळाडूंचे आरक्षण ५% वरून १०% करण्यात यावे.

४)शहरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व पदक विजेत्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये ५० हजार ते १ लाखापर्यंत वाढवण्याची तरदूत करण्यात यावी यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढेल आणि आपल्या शहरातून जास्तीतजास्त उत्कृष्ट खेळाडू तयार होण्यास मदत होईल.

५)पिंपरी चिंचवड शहरातील महानगपालिकेची एकमेव खेळाडू घडवणारी शाळा म्हणजे क्रीडा प्रबोधिनी त्यामध्ये अति तातडीने सेमी इंग्लिश शिक्षण पद्धती सुरु करण्यात यावी कारण क्रीडा प्रबोधीनी मध्ये शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी (खेळाडू) शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मिळणारे शिक्षण हे सेमी इंग्लिश मधून असावे आणि शाळेमधील मिळणाऱ्या सुविधादेखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिळाव्या.

६)शहरातील खेळाडूंना दैनंदिन सरावासाठी वापरात येणाऱ्या साहित्य खरेदीमध्ये अनुदान किंवा मोफ साहित्य उपलब्ध करण्यात यावे.

७)पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सर्व शाळांमध्ये क्रीडा मागदर्शक म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंची नेमणूक करावी आणि त्यांना योग्य मानधन देण्यात यावे जेणेकरून आपल्या शहरातून चांगले खेळाडू घडतील आणि शहराचा नावलैकिक वाढेल.

८)पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या “खेळाडू दत्तक योजना” पुन्हा चालू करण्यात यावी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी अनुभवी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय खेळाडूंची योग्य मानधनावर नियुक्ती करावी.

९)शहरातील सर्वात मोठे अण्णासाहेब मगर स्टेडियम चे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून त्यामध्ये सर्व खेळांची मैदाने तयार करण्यात यावी.

१०)हिवाळ्याचे दिवस असल्याने मैदान, जलतरण व इतर क्रीडा सुविधा ज्या बंद आहेत ते चालू करण्यात याव्यात आणि त्याठिकाणी प्रशिक्षक नेमावेत.

११) शालेय स्पर्धा मध्ये खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त असतो परंतु चिंतेची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत चाललाय त्यामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयन्त करावे.