राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना ‘जोडे मारो’ (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्री
आंदोलनकर्ते मागवले होते की काय?

दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धतीने गेल्या 70 वर्षात कधीही बोलले गेले नव्हते. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात सावरकरांबद्दल आदरच होता. पण 2014 नंतर हिंदुत्ववादी सरकार आल्यावर मोठ्या प्रमाणात गांधी-नेहरूंच्या विरोधात अत्यंत अश्लाघ्य पद्धतीने फोटोशॉप केलेले अनेक मेसेजेस सोशल मीडियातून भाजपच्या आयटी सेल कडून लोकांपर्यंत पोहोचवले गेले. त्याला प्रतिक्रिया म्हणून मग नवशिक्षित पिढीनेसुद्धा सावरकरांची कागदपत्रे अभ्यासून साधार उदाहरणे देत सावरकरांच्या विरोधात लिहिणे सुरू केले. त्यामुळे लोकांना सावरकरांनी अनेकदा अंदमान जेलमधून माफीपत्रे पाठवली होती हे कळू लागले. तसेच त्यांनी 1937 ला कैदेतून पूर्णपणे मुक्त झाल्यावर स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे 1947 पर्यंत कुठल्याही प्रकारे स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला नव्हता हेही कळले. याचा अर्थ सावरकर हे माफीवीर आहेत हे सामान्य लोकांना कळण्यासाठी काँग्रेसने नाही तर भाजपनेच हातभार लावला आहे. कारण त्यांनी गांधी-नेहरूंच्या विरोधात जर शिवराळ टीका केल्या नसत्या आणि अफवा पसरवल्या नसत्या तर सावरकरांवरही अशा प्रकारची प्रतिक्रिया जाहीरपणे होणे टाळले असते. तेव्हा सावरकरांना बदनाम करण्यात अप्रत्यक्षपणे भाजपच कारणीभूत आहे हे लक्षात येते.

तसेच गेली आठ वर्षे केंद्रात भाजपचे सरकार (BJP Government) आहे. 2014 पूर्वी काँग्रेसच्या विरोधात बोलताना ‘सावरकरांना भारतरत्न द्या’ म्हणून सतत टाहो फोडत काँग्रेसची कोंडी करणाऱ्या याच भाजपेई सरकारने आठ वर्षे उलटून गेली तरी अजूनपर्यंत सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित का केले नाही? यावरून भाजपचे सावरकरांवरील प्रेम बेगडी आहे असेच म्हणायला हवे. भाजपची मातृसंस्था जी संघ त्याचे द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांनी सावरकरांना खड्यासारखे वेगळे बाजूला ठेवले होते. कारण सावरकरांचे हिंदुत्व चातुर्वर्ण्य मानणाऱ्या गोळवळकरांच्या पचनी पडणारे नव्हते. म्हणून त्यांनी सावरकरांचा संघाशी संबंध नाही असे जाहीरपणे अनेकदा सांगितले होते. मग आताच भाजपेईंना सावरकरांचा पुळका यायचे कारण काय?

सावरकरांबद्दल भाजपेईंना खरीच कळकळ असेल तर माझी त्यांना – विशेषतः अभ्यासू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अशी विनंती आहे की, त्यांनी राहुल गांधींवरवर वैयक्तिक हल्ला करण्यापेक्षा राहुल गांधींनी ज्या पद्धतीने कागदपत्राचा आधार घेऊन सावरकरांवर आरोप केलेले आहेत त्याच पद्धतीने त्यांचे म्हणणे खोडून काढावे. ब्रिटिशांनी सावरकरांची गोपनीय कागदपत्रे आता खुली केलेली आहेत. तेव्हा त्यांचा अभ्यास करून राजीव गांधींना खोटे ठरवावे. त्यानंतर राहुल गांधी जर चुकीचे ठरत असतील तर मग अभ्यासू फडणवीस महाशयांनी स्वातंत्र्यवीरांची अब्रूनुकसानी केली पर्यायाने देशाचीही अब्रू घालवली म्हणून देशद्रोहाचा ठपका ठेवून त्यांच्यावर कोर्टात दावा ठोकावा. म्हणजे ‘ना राहेगा बास और ना बजेगी बासुरी।’ हे आव्हान अभ्यासू फडणवीस स्वीकारतील काय?