लोकमराठी न्यूज नेटवर्क | १ जुलै २०२३
बुलढाणा : येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, तिला काही झालं तर नसेल या भीतीने आईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मला अवंतीजवळ घेऊन चला, असं म्हणत तिच्या आईने टाहो फोडला. त्या माऊलीला तर हे देखील माहिती नाव्हतं की तिची अवंती आता या जगात नाही. ती तिला सोडून गेली आहे.
अवंतीच्या वडिलांचं ती लहान असतानाच निधन झालं. त्यानंतर तिची आई प्रणिता यांनीच अवंती आणि तिची बहीण मोनू यांचा सांभाळ केला. प्रणिता या मेघे विद्यापिठात कार्यरत असल्याची माहिती आहे. आईची प्रकृती बरी नसते म्हणून अवंती परदेशी गेली नाही. तिने एक मॉडेल म्हणून खूप प्रसिद्धीही मिळवल्याची माहिती आहे. ती नोकरीच्या निमित्तानेच पुण्याला जात होती. पण वाटेत काळाने तिच्यावर घाला घातला.