पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्यापासून महाअभियान; अयोध्येतील अक्षता पोहचणार घराघरात

पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्यापासून महाअभियान; अयोध्येतील अक्षता पोहचणार घराघरात

पिंपरी दि.३१ (लोकमराठी)- अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पिंपरी चिंचवड समितीच्यावतीने दि.१ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत शहरातील घरोघरी जावून श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अयोध्या येथील पूजित मंगल अक्षता वितरण करण्यात येणार आहे. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासह देहू, आळंदी, देहूरोड कॅन्टोन्मेंट , हिंजवडी ग्रामपंचायत परिसरात हे निमंत्रण महाअभियान होणार आहे.

श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे शहर संयोजक धनंजय गावडे, सहसंयोजक महेश्वर मराठे, विश्व हिंदू परिषद पुणे विभाग मंत्री नितीन वाटकर यांनी ही माहिती दिली. या निमित्ताने संपूर्ण देश, शहर पुन्हा राममय व्हावे, या हेतूने श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासातर्फे, पिंपरी चिंचवड समितीने हे अभियान आयोजित केले आहे.

या अभियानातंर्गत या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडकरांना अयोध्येतील रामललाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने शहरातील हजारो रामसेवक १ ते १५ जानेवारी २४ दरम्यान घरोघरी जातील.

शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षता, सोबत निमंत्रण, मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देतील. प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे, व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे व राममंदिर निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत् २०८०, अर्थात सोमवार, २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत साकारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व देशभरातील धार्मिक, सामाजिक, आर्थिक, उद्योग, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, साहित्य आदी विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड मधील देखील मान्यवरांचा समावेश आहे.

अयोध्येतून आणलेल्या मंगल अक्षता पूजनाचे कार्यक्रम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही आयोजित करण्यात आले जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज संस्थान देहू, माऊली संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, मोरया गोसावी मंदिर चिंचवड, इस्कॉन मंदिर रावेत,संत गजानन महाराज मंदिर सांगवी येथे कलशपूजानाने या उपक्रमाला सुरवात झाली त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पिंपरी चिंचवड शहरातील २५०० वर स्थानी अक्षता पूजनाचे कार्यक्रम, कलश यात्रा संपन्न झाल्या यामध्ये साधारण आठ लाखांवर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कलशाचे दर्शन घेतले. या अक्षता पूजनासाठी समाजाच्या सर्व स्तरातील घटकांचा समावेश असलेल्या समित्यांची स्थापना करण्यात आली असून, या समित्या आपापल्या भागात अक्षता वितरण करतील.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

१ ते १५ जानेवारी २४ दरम्यान गृहसंपर्क अभियान संपन्न झाल्यानंतर सोमवार २२ जानेवारी रोजी पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पिंपरी चिंचवड समितीतर्फे अनेकविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मंदिरांमध्ये भजन, रामनाम जप, आरती, रांगोळी, संगीत, नृत्यकलासह विविध कलांचे कार्यक्रम, सोसायट्या, वाड्या वस्त्या, कॉलनी, प्रतिष्ठाने, मंडळांमध्ये रामसंकीर्तन होणार आहे. या आनंदोत्सवात पिंपरी चिंचवडकर नागरिक- बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Actions

Selected media actions